आत्मविश्वास वाढविण्यासाठी सर्वोत्तम टिप्स
आत्मविश्वास असेल तर आपण जगही जिंकू शकतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास! असे आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. पण यात अर्थ असा आहे की, स्वतःच्या गुणांवर, क्षमतांवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय. आत्मविश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देवू शकतो. मोठे यश मिळवू शकतो. असा हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, ते आता सविस्तर बघू.
1. स्व-चा स्वीकार:-
आत्मविश्वास यात स्व-चा स्विकार ही पहिली पायरी आहे. आत्म किंवा स्व ची ओळख असेल तर स्व चा स्विकार सोपा होतो. स्वतःला ओळखा, स्वतःचे गुण-अवगुण ओळखा. स्वतःची बलस्थाने, आणी कमतरता ओळखा. आणी या सर्व गुण आणी अवगुणांसोबतच स्वतःचा निरपेक्ष स्विकार करा. स्वतःला आहे तसे स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसेच छान आहात, कारण तुमच्या गुण आणी अवगुणांचे एक विलक्षण आणी अद्वितीय असे मिश्रण असणारे या जगात तुम्ही एकमेव आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःचा निरपेक्ष स्विकार करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःबद्दल नकारात्मक विचार टाळा. स्वतःबद्दल सकारात्मक आणी छान विचार करणे म्हणजेच स्वतःवर प्रेम करणे होय. नकारात्मक आणी स्वतःला कमी लेखणारे विचार करू नाक. असे विचार मनातून काढून टाका. यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे स्वतःवर नेहमी प्रेम करा आणी स्वतःला सकारात्मक ठेवा.
2. ध्येय निश्चित करा :-
स्वतःची ओळख झाल्यावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करू शकता. तुम्हाला नक्की काय हवे आहे याचा विचार करा- पैसे, कुटुंब, मनःशांती, की अजून काही, किंवा हे सगळेच हवे आहे. तुमची ध्येये निश्चित करा. काय-काय हवे आहे याची छान यादी करा. त्या मोठ्या ध्येयांना छोट्या-छोट्या ध्येयांमध्ये तोडा. या छोट्या ध्येयांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लहान ध्येये साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. ही छोटी ध्येयपूर्ती ही साजरी करा. हे छोटे आनंद नक्कीच तुमच्या आत्मविश्वासत भर घालतील. लहान-सहान उद्दिष्टे साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो, त्यामुळे प्रत्येक छोट्या यशाकडे एक ध्येयपूर्ती म्हणून बघा.
3. नवीन गोष्टी शिका :-
तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील किंवा तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या नवीन गोष्टी शिका. नवीन कौशल्ये शिका. नेहमीच्या कामाला पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी शिका. नवीन कौशल्ये तुम्हाला नवीन अनुभव देतात. एखाद्या विषयात तुम्हाला आत्मविश्वास कमी वाटत असेल तर त्या विषयात ज्ञान मिळवा. त्यासंबंधीत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. योग्य माहिती, योग्य ज्ञान तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे नेहमी नवीन गोष्टी शिकत रहा, नवीन अनुभव घेत रहा. नवीन कौशल्यातून आपली कार्यक्षमता वाढतात. त्याचबरोबर आपल्याला आनंदही देतात. त्यातून आपला आत्मविश्वास उजळून निघतो. म्हणूनच मधमाशीप्रमाणे ज्ञानसंचय करत रहा.
4. स्वतःची काळजी घ्या :-
आपली काळजी घ्या. म्हणजेच योग्य आहार, नियमित व्यायाम आणी पुरेशी झोप घ्या. स्वतःचे वेळापत्रक ठरवा. रुटीन पाळण्याचा प्रयत्न करा. स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. स्वतःच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रीत करा. स्वतःविषयी चांगले बोला. “मी करू शकतो/शकते”, “मी जिंकणार आहे” यासारख्या सकारात्मक स्वयंसुचना द्या. वेळच्या वेळी योग्य आहार घ्या. नियमित व्यायाम करा. स्वतःच्या शरीराची आणी मनाची काळजी घ्या. शारीरिक आणी मानसिक आरोग्य जपा. ध्यान करा. मनाला मजबूत करा. यातून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. शरीराची आणी मनाची शक्ति तुम्हाला आत्मविश्वास देते.
5. संवाद साधा :-
सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधा. इतरांशी बोलताना आत्मविश्वासाने बोला. डोळ्यात डोळे घालून बोला. आपल्या देहबोलीकडे लक्ष द्या. आपली देहबोली, तसेच आपले विचार सकारात्मक असू द्या. स्पष्ट आणी सकारात्मक बोला. सितहास्य करा. सरळ, ताठ उभे रहा. शांततेत, न घाबरता आपले मत मांडा. तुमचे बोलणे, तुमची देहबोली आत्मविश्वास व्यक्त करते. त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या.
6. अपयशाला घाबरू नका :-
अपयश येऊ द्या. आपयशकडे सकरात्मकतेने बघा. त्याला सामोरे जा. त्यातून बोध घ्या. आणी पुढे जा. प्रत्येक व्यक्तीला कधीनाकधी अपयश येत असतेच. त्याला घाबरू नका. आपयशकडे एक संधी म्हणून बघा. त्यातून तुमच्यात काय कमी आहे, किंवा तुम्ही कुठे चुकलात याचा विचार करा. अपयशातून काहीतरी शिकून पुढे जाणे महत्वाचे असते. अपयश हे नवीन संधीसाठी एक पायरी असते, असा विचार करा. अपयशाला तुम्ही कसे सामोरे जाता यावरून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. म्हणूनच अपयशाला घाबरू नका.
7. मदत घ्या :-
गरज वाटल्यास मित्र कुटुंबीय किंवा तज्ञांची मदत घ्या. इतरांशी बोलल्याने समस्या कमी होतात. तुम्ही एकटे सर्वज्ञानी नसता. इतरांची मदत घेताना कमीपणा वाटू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीची कौशल्ये, तिची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. त्यातून तुम्हाला मदतच मिळत असते. प्रत्येक काम स्वतः केल्याने तुम्ही खूप थकता आणी तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. म्हणून कामे वाटून दिल्याने तुमची मदतच होऊ शकते. आणी आपण आपले काम जोमाने आणी आनंद घेत पूर्ण करू शकतो. यातून तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कार्यपूर्तीचा आनंद तुम्ही इतरांसोबत घेऊ शकता.
8. आत्मविश्वास वाढवणाऱ्या लोकांसोबत रहा :-
नकारात्मक, निराशाजनक लोकांपेक्षा सकारात्मक, प्रेरणादायी लोकांसोबत रहा. प्रेरणादायी, उत्साहवर्धक लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. अश्या लोकांच्या सहवासात रहिल्याने आपलाही उत्साह वाढतो. सकारात्मकता वाढते. ध्येय मिळवण्याची प्रेरणा वाढते. आणी पर्यायाने आपल्या आत्मविश्वासतही वाढाच होत असते. थोडक्यात, आत्मविश्वास वाढवणाऱ्या लोकांसोबत आपला जास्तीत जास्त वेळ घालवा.
9. स्वतःवर विश्वास ठेवा :-
स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. स्वतःचा आदर करा. निर्णय घेण्यास घाबरू नका. योग्य वेळी, योग्य निर्णय घ्या. आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवा. सुरुवातीला छोटे निर्णय घ्या. हे छोटे निर्णय योग्य ठरल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो. पुढे तुम्ही आत्मविश्वासाने मोठे निर्णय योग्य रीतीने घेऊ शकता. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाची ध्येये, प्रगती आणी प्रगतीची चाल वेगवेगळी असू शकते. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्याशी न करता आपण आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करावे. स्वतःवर योग्य विश्वास ठेवल्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो. तुम्ही काहीही करू शकता यावर विश्वास ठेवा. यातून तुमचा आत्मविश्वास वाढत असतो.
10. आव्हानांना सामोरे जा :-
स्वतःला आव्हान करा. येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका. आव्हाने तुमची क्षमता तपासण्यासाठी येत असतात. त्यामुळे डगमगू नका. तुमच्या क्षमता वाढवा. सर्व प्रकारची आव्हाने तुम्हाला नवीन धडा देत असतात. त्यातून शिका. तुमच्या कौशलयांना वाव द्या. तुमची क्षमता आणी कौशल्ये वाढवा. यातून तुमचा आत्मविश्वास एक निराळ्या पातळीवर जात असतो. त्यामुळे आव्हानांना सामोरे जा.

या सर्व गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील, अशी आशा आहे. याचबरोबर, तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी, छंदासाठी वेळ काढा; इतरांना मदत करा; कृतज्ञ रहा, यासरख्या काही गोष्टीतूनही तुमचा आत्मविश्वास वाढतच असतो. आत्मविश्वास हा नियमिततेतून, सकारात्मक दृष्टिकोनातून वाढत असतो. त्यामुळे नवीन काहीतरी शिकत रहा. स्वतःला सतत प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करा. यातून तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण आणी यशस्वी व्यक्ति नक्कीच व्हाल.
पुढील आत्मविश्वासपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!